Saturday, June 18, 2022

रिकाम्या खुर्चीचं रहस्य...

एकदा एक तरुण मुलगी एका संतमहात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”

“का नाही...? नक्कीच येईन मी...” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही...नाही...तसं नाहीये.” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही...अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही."

"परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला."

"त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय.”

त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मे हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका.”

पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला...पण काल सकाळी ते देवाघरी गेले."

"त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं...जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”

त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा.”

प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी 'तो' सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे. 

अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनं ।

देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिं अचन्चलं ॥ 

हिंदू धर्मात असलेली ही प्रार्थना अत्यंत गहन आहे. 

या प्रार्थनेद्वारे भक्तानं प्रभूकडे तीन इच्छा मागितल्या आहेतः- 

१. कोणत्याही शारिरीक वेदनांविना मृत्यु 

२. प्राथमिक आवश्यकतांची पूर्तता होईल असं साधं आयुष्य (महाल माड्या नकोत नाथा, माथ्यावर दे छाया)

३. आणि कोणत्याही प्रसंगी डगमगणार नाही अशी प्रभूचरणांवर अढळ श्रद्धा!

C & P

(एका इंग्रजी कथेचा स्वैरानुवाद)

No comments:

Post a Comment

QUIZ ON SOCIAL SCIENCE

🙂: Generate multiple-choice questions 🤖 Smallpdf.com: Questions: 1. What are the classifications of the Central Civil Services accordin...

Latest NewsWELCOME TO SMARTPEOPLESMARTLEARNING.BLOGSPOT.COM
Thank You for site Visit. Follow our blog.