मराठी भाषा गौरव दिन' व 'राजभाषा मराठी दिन'
'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
"मराठी राजभाषा दिन" ' मराठी दिन' हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (जन्म : नाशिक, २७ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होत व चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत.
कुसुमाग्रजांचे कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे.
जीवन
कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे टोपणनाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.
वि. वा. शिरवाडकर यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण पिपळगावच्या लोकलबोर्ड शाळेत झाले आणि नंतर इंग्रजी पहिलीच्या शिक्षणासाठी ते नाशिकच्या सरकारी हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये म्हणजे हल्लीच्या रुंग्ठा विद्यालयात प्रवेश घेतला. वि. वा. शिरवाडकरांना त्यांच्या कुटुंबात ‘तात्या’ म्हणून संबोधले जायचे. पुढील आयुष्यात मग ते सर्वांचेच ‘तात्यासाहेब’ झाले.
तात्यासाहेबांना क्रिकेट व नाटक यांचे अतिशय वेड होते. शाळेत असतानाच त्यांच्या काव्य लेखनाला सुरुवात झाली होती. १९२९ साली देवदत्त नारायण टिळक यांच्या ‘बालबोधमेवा’ या मासिकात त्यांची कविता प्रसिद्ध झाली. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर १९३० साली नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ‘रत्नाकर’ मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या.
१९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे.
लेखनशैली
सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.
साहित्य
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
कविता संग्रह
अक्षरबाग (१९९९)
किनारा(१९५२)
चाफा(१९९८)
छंदोमयी (१९८२)
जाईचा कुंज (१९३६)
जीवन लहरी(१९३३)
थांब सहेली (२००२)
पांथेय (१९८९)
प्रवासी पक्षी (१९८९)
मराठी माती (१९६०)
महावृक्ष (१९९७)
माधवी(१९९४)
मारवा (१९९९)
मुक्तायन (१९८४)
मेघदूत(१९५६)
रसयात्रा (१९६९)
वादळ वेल (१९६९)
विशाखा (१९४२)
श्रावण (१९८५)
समिधा ( १९४७)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४
निबंधसंग्रह
- आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
- प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटके
- ऑथेल्लो
- आनंद
- आमचं नाव बाबुराव
- एक होती वाघीण
- किमयागार
- कैकेयी
- कौंतेय
- जेथे चंद्र उगवत नाही
- दिवाणी दावा
- दुसरा पेशवा
- दूरचे दिवे (रूपांतरित, मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड. लेखक ऑस्कर वाईल्ड)
- देवाचे घर
- नटसम्राट
- नाटक बसते आहे
- बेकेट
- महंत
- मुख्यमंत्री
- ययाति देवयानी
- राजमुकुट
- विदूषक
- वीज म्हणाली धरतीला
- वैजयंती
कथासंग्रह
- अंतराळ (कथासंग्रह)
- अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
- एकाकी तारा
- काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
- जादूची होडी (बालकथा)
- प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
- फुलवाली (कथासंग्रह)
- बारा निवडक कथा (कथासंग्रह)
- सतारीचे बोल (कथासंग्रह)
कादंबऱ्या
- कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
- जान्हवी (कादंबरी)
- वैष्णव (कादंबरी)
- आठवणीपर
- वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
एकांकिका
- दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३.
- देवाचे घर १९५५, २री आवृत्ती १९७३.
- नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०, २ री आवृत्ती १९८६.
- प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९.
- बेत, दीपावली, १९७०.
- संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.
लघुनिबंध आणि इतर लेखन
- आहे आणि नाही
- एकाकी तारा
- एखादं पण, एखादं फूल
- प्रतिसाद
- बरे झाले देवा
- मराठीचिए नगरी
- विरामचिन्हे
- कुसुमाग्रज शैलीचे अंतरंग (डाॅ. सुरेश भृगुवार)
- कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, लेखक : द.दि. पुंडे, मेहता प्रकाशन, पुणे, १९९१, (दुसरी आवृत्ती)
- कुसुमाग्रजांचा सामाजिक साहित्यविचार : डॉ. देवानंद सोनटक्के लिखित 'समीक्षेची अपरूपे-हर्मिस प्रकाशन (पुणे, २०१७) या पुस्तकातील एक लेख
- कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास (डाॅ. द.दि. पुंडे)
- भारतीय साहित्याचे निर्माते कुसुमाग्रज (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक, निशिकांत मिरजकर; मराठी अनुवाद - अविनाश सप्रे, साहित्य अकादमी, २०११)
- सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (संपादक - डाॅ. नागेश कांबळे)
- रूपरेषा, वि.वा .शिरवाडकर, संपादक : सुभाष सोनवणे, चेतश्री प्रकाशन, अमळनेर, १९८४
- शिरवाडकरांची नाटके (शोभा देशमुख)
- ’मराठी माती’ला १९६० साली
- ’स्वगत’ला १९६२ साली
- ’हिमरेषा’ला १९६२ साली
- ’नटसम्राट’ला १९७१ साली
- ’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
- "ययाती आणि देवयानी" या नाटकास १९६६ या वर्षी तर संगीत "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
- विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
- भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार (१९९१ साली)
- भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
- अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार त्यांना १९६५ मध्ये प्राप्त झाला.
- अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव दिले गेले आहे.
- १९७४ साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
- १९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
- १९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
- १९६० मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड
- १९६४ च्याच मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
- १९७० साली कोल्हापूर येथे भरलेल्या ५१व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
- १९९० साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
- त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
- नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : हा कवी प्रा. शांताराम हिवराळे यांना मिळाला होता.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
- नशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे याही पुरस्काराचे स्वरूप असते. २०१० साली कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, २०११ साली हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, २०१२ साली मल्याळी साहित्यिक के.सच्चिनानंदन आणि २०१३ साली गुजराती कवी, नाटककार आणि समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हा, हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून मिळाला होता.
- नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनी, १० मार्चला एक वर्षाआड ‘गोदावरी गौरव पुरस्कार' देण्यात येतात. अभिनेते नाना पाटेकर, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापिका डॉ. कनक रेळे, रॅम सायकल शर्यत विजेते डॉ. महाजन बंधू, प्रसिद्ध वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे व महिला सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांना हा पुरस्कार मिळाला आहे, (२०१६)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे काॅन्टिनेन्टल प्रकाशनपुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या 'संदर्भासहित' कवितासंग्रहाला प्रदान झाला. (२८ फेब्रुवारी २०१९)